श्रीविद्या दीक्षा – विज्ञान

0
473

श्रीविद्या दीक्षा – विज्ञान

– श्री प्रमोद देवल

जय गुरु. गेल्या आठवड्यात काही श्रीविद्याउपासकांना गुरुपरम्परेविषयीची सोप्या शब्दात एक उदाहरण घेऊन सांगितलेली माहिती आपणा सर्वांसाठी पुढे देत आहे.

परमशिव म्हणजे एक मोठे विद्युत जनित्र (generator in the power station), ऊर्जेचा अक्षय्य स्रोत( infinite source of energy). त्या ऊर्जेच्या प्रकाशानेच आपल्याला आपल्या घरात (अन्तरात्म्यात) काय आहे, वगैरे स्व-स्वरूपाचे यथार्थ ज्ञान प्राप्त होऊ शकते. जोपर्यन्त आपले घर (अंतरात्मा) या विद्युतजनित्राशी प्रत्यक्ष जोपर्यन्त जोडले जात नाही, तोपर्यन्त आपल्या घरी वीजेचा प्रकाश पडणार नाही. पण त्याकरिता त्या जनित्राशी आपली जोडणी होण्यासाठी विविध विद्युतवाहक तारा (transmission lines) व ट्रान्सफार्मर, सबस्टेशन यातूनच जावे लागते. कोणी म्हणेल की मी माझ्या घरातून power station पर्यन्त direct line टाकतो, तर ते शक्य नाही.

दीक्षा म्हणजे काय ? , तर आपले power-station परमशिवाशी विविध transformers, transmission lines, substations द्वारा झालेले कनेक्शन. आपली गुरुपरम्परा म्हणजेच ही मधली कडी- transformers, transmission lines, substations इत्यादी. गुरुपरम्परेत काही काही टप्प्यांवर आदि-शंकराचार्य, भास्करराय, जयजय यांसारखे प्रसिद्ध गुरु असतात, त्यांचे कार्य step-up transformer प्रमाणे drop झालेले voltage वाढवून पुन्हा मूळ पदावर आणणे हे असते. पण वास्तविक पहाता परंपरेतील प्रत्येक गुरु हे पूर्ण व सक्षम असतात. गुरुपरम्परेत शाम्भवी दीक्षा देतांना गुरु आपले चरण शिष्याच्या मस्तकी प्रत्यक्ष ठेवून direct connection करवितात. त्यांची दीक्षा होतांना पण त्यांचे मस्तकी त्यांच्या गुरुंचे (आपले परमगुरु) गुरुचरण स्थापिलेले असतात, अशा रितीने आपली कडी मस्तक >>स्वगुरुचरण >> स्वगुरुमस्तक >> परमगुरुचरण >> परमगुरुमस्तक >> परमेष्ठिगुरुचरण >>>> अशा क्रमाने थेट आदिगुरु परमशिवांपर्यन्त पोहोचलेली आहे. म्हणूनच सशक्त गुरुपरम्परेशिवाय फक्त स्वतःच्या अभ्यासाने आत्मज्ञान प्राप्त होणे जवळपास अशक्य कोटीतील गोष्ट मानली जाते, त्याने फारतर कन्दिलासारखा धूसर प्रकाश थोडावेळ मिळेल.

अशा सशक्त गुरुपरम्परेतील सद्गुरुंकडून प्राप्त झालेल्या दीक्षेने वीज आली, प्रकाश मिळाला. पण त्या प्रकाशाचा जर आपण सदुपयोग केला नाही, डोळे मिटून झोपूनच राहिलो, तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून दीक्षेनंतर जोमाने आत्मचिन्तन, आत्मशोधन करायचे आहे व त्याकरता शास्त्राभ्यास आवश्यक. तसेच त्या वीजेची तारांची (wiring) व दिव्यांची देखभाल पण हवी, ज्याकरिता सतत उपासनेद्वारे होणारी चित्तशुद्धी पण आवश्यक.

मन्त्रोपदेश व दीक्षेतील फरक
दीक्षा ही कायमस्वरूपी जोडणी, तर मन्त्रोपदेश ही तात्पुरती जोडणी. आधी गुरु मन्त्रोपदेश देतात. मग काही काळाने शिष्य वायरिंगची योग्य ती देखभाल करु शकेल व विजेचा दुरुपयोग करणार नाही असा विश्वास गुरुला आला (तत्परता) की गुरुकृपेने दीक्षा प्राप्त होते. मन्त्रोपदेशात गुरु शिष्याच्या मस्तकी हात ठेवतात, तर दीक्षेत साक्षात चरणकमल प्रस्थापित करतात. शास्त्रानुसार मनुष्यशरीरातील जास्तीतजास्त ऊर्जा पायात साठलेली असते (गुरुत्वाकर्षणाचा नियम देखील हेच सांगतो) व म्हणून शाम्भवीदीक्षेलाच पूर्णदीक्षा असे म्हटले जाते. यात शिष्याचे काम फक्त गुरुला पूर्ण शरण जाण्याचे आहे. दीक्षेसाठी गुरुच्या मागे लागणे म्हणजे गुरुच्या निर्णयक्षमतेवरच अविश्वास दाखविण्यासारखे आहे.

दीक्षा झालेल्या काहींना स्वतः transformer होण्याचा आदेश वरील substation कडून मिळतो, त्यामुळे त्यांच्यावर स्वतःच्या घरी प्रकाश देतांनाच अजून काही नव्या घरी पण तात्पुरती जोडणी देऊन प्रकाश देण्याची जबाबदारी येते. ते करतांना त्यांना स्वतःची देखभाल अधिक चांगल्या प्रकारे करावी लागते  (उपासनेत तत्परता) कारण आता त्यांच्यावर अजून काही घरेदेखील प्रकाशाकरता अवलंबून असतात.

अशा काही distribution transformers ना पुढे substation होण्याचा आदेश होतो व त्यांना योग्य शिष्यांना दीक्षा – कायम जोडणी- permanent connection देण्याचा आदेश मिळतो. असा मन्त्रोपदेश किंवा दीक्षा देतांना गुरुंचा भाव नेहमी शिष्याच्या उद्धारासाठी transformer सारखा निमित्तमात्र होण्याचा असतो,  पण शिष्याचा भाव मात्र  गुरु हेच आदिशिव असाच असायला हवा, कारण त्याला मिळणारा ऊर्जेचा स्रोत हा त्याला स्वगुरुकडूनच प्राप्त होणार, इतर गुरु कितीही सशक्त असले तरी त्यांच्याकडून मिळणे शक्य नाही, कारण त्याचे घर हे एक गुरु केल्यावर इतरांच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

म्हणूनच शास्त्र हेच सांगते की गुरु करतांना अखण्डित गुरुपरम्परा, ज्ञानवान गुरु, संपूर्ण शरणता, आणि उपासनेत तत्परता ह्या चार गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात.
जय गुरु!

Comments